उपक्रमशील शिक्षकांनी रक्तदान करुन दिला सामाजिक संदेश

अमळनेर : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. रक्तदानासाठी आरोग्य मंत्र्यांनी केलेल्या आवाहनानुसार, शिवशाही फांऊडेशनने प्रतिसाद दिला आहे. तसेच काळाची पाऊले ओळखून उपक्रमशील शिक्षकांच्या सहकार्याने शिवशाही फांऊडेशनने माणूसकीचा वसा जपला. उपक्रमशिल शिक्षक डी.ए.धनगर व उमेश काटे यांच्या संकल्पनेतून काही उपक्रमशील शिक्षक पुढे आले. त्यांनी समाजातील गरजूंसाठी रक्तदान करुन कृतियुक्त सामाजिक संदेश दिला. रक्तदान करणारे शिक्षक ही बदलत्या समाजाची नांदी म्हणावी लागेल. यावेळी या शिक्षकांनी “मानवतेची कास धरुया..कोरोनाला हद्दपार करुया” असा संकल्पही केला.
आजच्या युगात अनेक व्यक्ती आपला स्वार्थ साधत असतांना अशा या गोष्टींना तिलांजली देत उपक्रमशील शिक्षक तथा शिवशाही फाऊंडेशनचे अध्यक्ष जयेशकुमार काटे, तालुका गणित मंडळाचे अध्यक्ष तथा बाजार समितीचे संचालक डी.ए.धनगर, आर्मी स्कुलचे प्रा.शरद पाटील, उपक्रमशिल प्राथमिक शिक्षक विशाल देशमुख, आर्मी स्कुलचे गणित शिक्षक गोपाल हडपे, शिवशाही फाऊंडेशनचे सचिव तथा आर्मी स्कुलचे शिक्षक उमेश काटे यांच्यासह स्वप्नील संभाजी पाटील व निखिल विजय बोरसे यांनी रक्तदान केले. अध्यापनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणारे शिक्षक यांनी कृतीतून रक्तदान हेच खरे श्रेष्ठदान असल्याचे दाखवून दिले. यावेळी तहसीलदार मिलिंद वाघ, जीवनश्री रक्तपेढीचे संचालक संतोष पाटील, मंडळ अधिकारी व्ही.पी.पाटील, तलाठी एम.पी.भावसार, पी.एस.सोनवणे, पी.पी.चव्हाण, वाल्मिक पाटील उपस्थित होते. यावेळी तहसीलदार वाघ यांनी शिवशाही फाऊंडेशनच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. शिक्षकांच्या या कृतीतून समाजासमोर व विद्यार्थ्यांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण होण्यास मदत होणार आहे.