
अमळनेर : येथील साने गुरुजी शाळेत कोरोना प्रतिबंधासाठी आमदार अनिल पाटील यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या तपासणी केंद्रात आज दुसऱ्या दिवशी ९० प्रौढ व ६० बालकांची अशी एकूण १५० रुग्णांची तपासणी करण्यात आली. दोन दिवसांत कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असून रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यावर निर्बंध घालता यावा यासाठी शहरातील सर्व एम.डी डॉक्टर्स यांच्या मदतीने यात सर्दी, ताप, खोकला लक्षणे असलेल्या रुग्णांना विषाणूंचा इतरत्र संसर्ग न होता लवकर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. डॉ.नितीन पाटील, डॉ.संदीप जोशी, डॉ.निखील बहुगुणे, डॉ.अविनाश जोशी, डॉ.प्रकाश ताडे, डॉ.विनोद पाटील, डॉ.शरद बाविस्कर, डॉ.प्रशांत शिंदे, डॉ.राजेंद्र शेलकर आदींनी रुग्णांची तपासणी केली. रुग्णांची मोफत तपासणी मोफत करण्यात येत आहे. शहर व तालुक्यातील सर्व खाजगी डॉक्टरांनी सर्दी, ताप, खोकला लक्षणे असलेल्या सर्व रुग्णांना याठिकाणी पाठवावेत. जेणेकरून कोरोना आहे किंवा नाही याची खात्री होईल व सर्व तालुक्यातील रुग्णांची एका ठिकाणी माहिती जमा होईल. संशयित रुग्ण सापडल्यास भविष्यातील कोरोनाला अटकाव करता येईल. आता दोन दिवसांत एकूण २२५ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.