जोखीम असली तरी आम्हाला सेवेचा आनंद : डॉ.नितीन पाटील

कॅम्पच्या तिसऱ्यादिवशी २०४ नागरिक व ८४ मुले असे एकूण २८८ जणांची केली तपासणी

अमळनेर : येथील सानेगुरुजी शाळेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार अनिल पाटील यांच्या आवाहनानुसार सुरू करण्यात आलेल्या रुग्ण तपासणी केंद्रात पालिका कर्मचारी व सर्व डॉक्टर्स जोखीम घेऊन केवळ एक कर्तव्य म्हणून सेवा देत असून याठिकाणी डॉक्टर देखील संपुर्ण सुरक्षितता बाळगत आहेत. जोखीम असली तरी आम्हाला सेवेचा आनंद असल्याची माहिती आयएमए चे अध्यक्ष डॉ.नितीन पाटील यांनी दिली. सोमवारी कॅम्पच्या तिसऱ्यादिवशी २०४ नागरिक व ८४ मुले असे एकूण २८८ जणांची तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत तीन दिवसात पाचशेहून अधिक रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली आहे.

अधिक माहिती देताना डॉ.नितीन पाटील यांनी सांगितले की, अमळनेर आयएमए चे डॉक्टर्स सदस्य आणि पालिकेचे डॉक्टर याठिकाणी सेवा देत आहेत. कोरोना हा संसर्गजन्य विषाणू असल्याने त्यापासून बचावासाठी सर्व डॉक्टर्स मास्क गाऊन, कॅप, ग्लोव्हज, सॅनिटायझर आदींचा वापर नियमानुसार करीत आहेत. प्रामुख्याने सर्दी, ताप व खोकल्याचे रुग्ण याठिकाणी तपासले जात आहेत. सोमवार ते शनिवार सकाळी १० ते १ या वेळेस कॅम्प सुरू राहत असून रविवारी कॅम्प बंद ठेवला जात असतो. या कॅम्प मध्ये येणाऱ्या रुग्णांची नोंद करून पत्ताही घेतला जात असून बाहेर गावाहून आलेल्या व्यक्तीस क्वांरटाईन चा शिक्का मारून दिला जात आहे. रुग्ण तपासताना सोशल डिस्टनसिंग ठेवण्यासाठी २ मीटर अंतरावर त्यास बसविले जाते. तपासणीनंतर आवश्यकता भासल्यास शासकीय रुग्णालयात पाठविले जाऊ शकते. जनतेने कोरोना पासून बचाव करण्यासाठी सर्दी व तापाची लक्षणे दिसल्यास सदर केंद्रात तपासणी करून घ्यावी. जेणेकरून आपले गाव आपण सुरक्षित ठेऊ. आमदार अनिल पाटील देखील याठिकाणी आम्हाला प्रोत्साहन म्हणून बराच वेळ देत आहेत. सोबत पालिका व महसूल प्रशासन, आरोग्य विभाग व इतर पदाधिकारी देखील मदतीला आहेत. आता जनतेने देखील आपली जबाबदारी ओळखून स्वतःला घरात बंदीस्त केल्यास निश्चितच आपण सर्व अमळनेरकर मिळून कोरोनाला माघारी पाठवू असा विश्वास डॉ.नितीन पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!