
अमळनेर : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात माणसांच्या वागणुकीच्या विचित्र घटना समोर येत असतांना, माणसातल्या प्रामाणिकपणाचे दर्शन देखील घडत आहे. येथील झामी चौक परिसरात चौलाफल्ली विकून गुजराण करणाऱ्या सोमनाथ हिरामण नाथजोगी यांना रस्त्याने जातांना पाकीट सापडले. पाकीट मालकाचा शोध घेऊन पाकीट परत करुन त्यांनी प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले.
याबाबत माहिती अशी की, येथील झामी चौक परिसरात चौलाफल्ली विकून गुजराण करणाऱ्या सोमनाथ नाथजोगी यांना गांधीनगर रस्त्याने जातांना पाकीट सापडले. या पाकीटात रोख रक्कम, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड व महत्त्वाचे कागदपत्रे होती. नाथजोगी यांनी हे पाकीट आपले मित्र रवी टेलर (बडगुजर) यांना दाखवून ते परत कसे करता येईल याची विचारणा केली. कार्डांवरील माहितीतून नाव कळले मात्र संपर्क नंबर नव्हता. यात केबलचे बिल भरल्याची पावती होती. यावरून रवी टेलर यांनी केबल चालक मिलिंद शिंदे यांच्या मोबाईल नंबर ला फोन करून पावतीवर लिलाधर पाटील नाव असल्याचे सांगितले. मिलिंद शिंदे यांनी आपले केबल ग्राहक असलेले प्रा.लिलाधर पाटील यांना फोन करून याबाबत माहिती दिली. यानंतर लगेच प्रा.पाटील रस्त्यातून माघारी फिरले. बाजारातून घाई गडबडीत भाजीपाला घेऊन परतत असताना प्रा.लिलाधर पाटील यांचे खिशातून रस्त्यावर पाकीट पडले होते. छत्रपती शिवाजी उद्यानाजवळ सोमनाथ नाथजोगी व रवी टेलर यांची भेट घेऊन प्रामाणिकपणे पाकीट परत करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांनी दोघांचे आभार मानले. सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनीही दुरध्वनीवरुन दोघांचे प्रामाणिकपणा व माणूसकीचे कौतूक केले.