फापोरे केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्रसिंग पाटील ३२ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त


अमळनेर तालुक्यातील फापोरे केंद्राचे केंद्रप्रमुख दादासाहेब राजेंद्रसिंग वामनसिंग पाटील दि.३१ मे २०२० रोजी ३२ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवाकाळात केलेल्या कार्याचा दत्तात्रय सोनवणे यांनी घेतलेला हा आढावा…

अमळनेर पासून अवघ्या ७ कि.मी.अंतरावर असलेले कुऱ्हे खुर्द हे दादांचे मूळ गाव. त्यांचे शिक्षण डी.एड्., एम.कॉम., बी.एड्. असून जि.प.जळगाव अंतर्गत दि.२९ फेब्रुवारी १९८८ रोजी पारोळा तालुक्यातील जि.प.प्राथ.शाळा, आडगाव येथून नोकरी ची सुरुवात झाली. त्यावेळी नोकरीच्या गावी राहणे पसंत करुन विद्यार्थ्यांसोबत गावाशीही आपले संबंध दृढ केले. आजही ते तेथील लोकांच्या सुख-दु:खात सामिल होऊन आपले ऋणानुबंध जपत आहेत. आडगावच्या या शाळेत सुमारे १२ वर्षे सलग सेवा केली. त्यानंतर प्रशासकीय बदलीनुसार दि.३० जून २००१ रोजी पारोळा तालुक्यातील नेरपाट या गावी तीन वर्षे सेवा करुन याच शाळेतून पदोन्नतीने केंद्रप्रमुख म्हणून आपल्या स्व तालुक्यातील बीटशाळा व केंद्रशाळा असलेल्या फापोरे बु.गावी दि.२७ फेब्रुवारी २००४ रोजी नियुक्ती झाली. कुटुंबात सहा बहिणी व तीन भाऊ. अन् या तिन्ही भावांचे अकरा लेकरं असा मोठा परिवार एकत्र कुटुंब पध्दतीत गुण्यागोविंदाने राहत होते. याच काळात त्यांचे लहान बंधू ह.भ.प.कै.रविंद्र महाराज यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने देहावसान झाले. एकीकडे पदोन्नतीसह स्व तालुक्यात आल्याचा आनंद तर दुसरीकडे पाठचा भाऊ आपली जीवननौका अर्ध्यावरच सोडून गेल्याचं भलमोठं दु:ख. त्यातच नोकरीनिमित्त बाहेर असल्याने संपुर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांचेवर आली होती. अशा अवघड परिस्थितीत खचून न जाता स्वत:ला सावरत त्यांनी संपूर्ण कुटुंबाचा सांभाळ केला. सर्वांना उच्च शिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभं केलं. सर्वत्र विभक्त व छोटं कुटुंबाचा बोलबाला चालू असतांना आजही एकत्र कुटुंब पध्दतीचा अंगिकार करुन समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. यासाठी अर्धांगिनी सौ.जिजाबाई यांची मोलाची व खंबीर साथ मिळाल्याचे दादा अभिमानाने सांगतात.

प्रापंचिक जबाबदारी बरोबर केंद्रप्रमुख म्हणून फापोरे बु.येथे हजर झाल्यानंतर त्यांनी आपल्या कामाच्या तत्परतेने व कुशल प्रशासनातून केंद्रातील शिक्षकांसह, विद्यार्थी, पालक व गावकरी यांचेशी प्रेमाचे व सलोख्याचे संबंध राखत ज्या उद्देशाने केंद्रप्रमुख पदाची निर्मिती झाली. त्या उद्देशाचे तंतोतंत पालन करत शिक्षकांना प्रोत्साहित करुन केंद्रातील शाळांची गुणवत्ता वाढीसाठी भरीव प्रयत्न केले. यात प्रेरणासभा, लोकसहभाग, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध उपक्रमांचे आयोजन करुन केंद्रातील १००% शाळा डिजीटल केल्या. त्याचबरोबर एबीएल शाळा, आयएसओ शाळा व ज्ञान रचनावादी शाळा इ.चा अवलंब करुन केंद्रातील शाळा बोलक्या व आकर्षक करण्यासाठी प्रयत्न केले. या कालावधीत एकाच ठिकाणी १० वर्षापेक्षा अधिक वर्षे सेवा झाल्याने प्रशासकीय कारणास्तव दि.१४ मे २०१३ ते ३० मार्च २०१५ काळात २ वर्षे चाळीसगाव तालुक्यातील खेडगाव येथे व तेथून पुन्हा आपल्या मूळ ठिकाणी फापोरे बु. येथे सेवा बजावली. आज वय वर्षे ५८ पूूूूर्ण करुन ३२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत. सेवेच्या एकूण कालावधीत शैक्षणिक कार्याबरोबर सामाजिक कार्यातही दादांंनी आपले योगदान दिले आहे. यात आपल्या प्रेमळ व मनमिळाऊ स्वभावामुळे तसेच सहकार्य वृत्तीमुळे अडल्यानडल्यास मदत करणे, मैत्रीपूर्ण व सलोख्याच्या संबंधामुळे आपल्या समाजासह इतर समाजातही गोतावळा निर्माण करुन त्यांच्या सुख-दु:खात नेहमी हजेरी लावणे. आपल्या बोलक्या व मनमोकळ्या स्वभावामुळे समाजातीलच नव्हे तर इतर समाजाचे सुध्दा विवाह संबंध घडवून आणणे. इत्यादी सेवाभावी कार्यामुळे जनमाणसात आजही दादांना आदराचे स्थान आहे. त्यांच्या अंगी दातृत्व, कर्तृत्व, नेतृत्व व उत्कृष्ट संघटन कौशल्य असल्याने बहुतेक सामाजिक, धार्मिक व अध्यात्मिक कार्यातही दादा अग्रेसर असतात. याचाच परिपाक म्हणून गेल्या दहा वर्षापासून श्री साई गजानन परिवारामार्फत आयोजित अमळनेर ते शेगाव पायी वारीत पुढाकार घेऊन ते वारीला जात आहेत. दरवर्षी पायी वारीत सहभागी भक्तांसाठी अन्नदानही करत आहेत. लहानपणापासून दादांना श्रम व कष्टाची सवय, अंगमेहनतीच्या व शेतीच्या कामाची आवड तसेच नियमित पायी चालणे, व्यायाम करणे, संतुलित आहार यामुळे ते आजही तरुणांना लाजवेल अशा कामाची कास धरतात. आपल्या उंच, रुबाबदार व धिप्पाड शरीरयष्टीमुळे दादा सेवानिवृत्त होत आहेत असे वाटत नाही. सेवानिवृत्तीनंतर ही दादा असेच शैक्षणिक, सामाजिक व अध्यात्मिक कार्यात निरंतर सेवा तसेच समाजातील गरजू व होतकरु मुलांसाठी मदतीचा हात देऊ इच्छितात. त्यांच्या निवृत्तीनंतरच्या आरोग्य संपन्न व सुख समृध्द जीवनासाठी श्री गजानन चरणी प्रार्थना…!

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!