स्वत:ला अपडेट करा; वाचनाशिवाय वक्ता होणं अशक्य : प्रा.डॉ. लिलाधर पाटील

युवा कल्याण प्रतिष्ठान व धनदाई महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय मोफत वकृत्व विकास कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न

अमळनेर : चांगला वक्ता बनायचे असेल तर प्रथम स्वत:ला अपडेट करा; वाचनाशिवाय वक्ता होणं अशक्य असल्याचे मत प्रा.डॉ. लिलाधर पाटील यांनी व्यक्त केले. अमळनेर येथील धनदाई महाविद्यालयाच्या यशवंत सभागृहात पहिल्या दिवशी काल दि.२९ रोजी झालेल्या कार्यशाळेत ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते. प्रा. अशोक पवार व प्रा.डॉ. लिलाधर पाटील हे दिनांक २९ व ३० एप्रिल २०२३ रोजी पार पडणाऱ्या या दोन दिवसीय कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक आहेत. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद पवार, उपप्राचार्य किशोर पाटील, समन्वयक बापूराव ठाकरे होते, रंजना पाटील, वैशाली शेवाळे, संजय सूर्यवंशी, श्रीकांत चिखलोदकर, अशोक पाटील, प्रेमराज पवार, चेतन जाधव, सोपान भवरे, महेश पाटील, गौतम मोरे, निकम यांचेसह विद्यार्थी वक्ते उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले.

युवा कल्याण प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा. अशोक पवार प्रास्ताविक करताना म्हणाले की, वक्तृत्व हा निरंतर चालणारा कार्यक्रम आहे. या कार्यशाळेत चांगले वक्ते घडविण्याचा मानस बोलून दाखविला. धनदाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद पवार म्हणाले की, परिपूर्ण नागरिक होण्यासाठी वक्तृत्व कला अंगी असणे आवश्यक आहे असे सांगत, जो चुकतो.. तो शिकतो असा सूचक इशारा दिला. यासाठी विविध पुस्तकांचे वाचन करणे गरजेचे आहे. वक्तृत्व विकास कार्यशाळेस महाविद्यालयाचे यशवंत सभागृह विनामोबदला उपलब्ध करुन देण्यात येईल असे आश्वासन दिले.

प्रा.डॉ. लिलाधर पाटील यांनी काल (दि.२९) पहिल्या दिवशी हसत खेळत जेम्स बॉण्ड व सिनेमातील डायलॉग सांगत सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. यात, भाषणाची पूर्वतयारी कशी करावी ? भाषणाचे मुद्दे कसे काढावेत ? भाषण करताना कोणत्या गोष्टी कराव्या ? काय करु नये ? याबाबत सविस्तर माहिती दिली. स्वत:ला अपडेट करा; वाचनाशिवाय वक्ता होणं अशक्य असल्याचे ते म्हणाले. भाषणासाठी वाचन, मार्गदर्शक भेटी, मोठी वर्तमान पत्रे वाचायला हवे. भाषणाचा आराखडा तयार झाल्यावर त्यात राहिलेले मुद्दे तपासून अधिक भर घालणारे मुद्दे घ्यावे यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे. भाषणाची सुरुवात करण्यापूर्वी महत्वाच्या ओळी, शेर शायरी, कोटेशन, महापुरुषाची वचने असावी. भाषण करताना बोलीभाषेत योग्य अंतर, विराम, अवरोह असावा. भाषणाची सुरुवात प्रभावी असावी. त्यात वेगळेपणा हवा. दिलेली वेळ लक्षात घ्यायला हवी. भाषणाच्या विषयाला अनुसरून एखादी सुसंगत गोष्ट, दृष्टांत, विनोद, उदाहरण दिल्यास ते फुलत असते. भाषण पाल्हाळीक पुनरावृत्ती न करता प्रेक्षकाला समजेल अशी विषयाची क्रमवार रचना असावी. भाषणाची सुरुवात व शेवट यात एकवाक्यता असावी.अशा विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. आपल्याला सर्वच माहिती असल्याचा आव आणू नये, जे माहित नाही ते मान्य करायला हवे असा मौलिक सल्ला दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापूराव ठाकरे यांनी तर आभारप्रदर्शन चेतन जाधव यांनी केले. मधल्या काळात अर्धवट लिहिलेल्या म्हणीचा कागद प्रत्येकाला देऊन त्या म्हणीचा दुसरा भाग असणारा मित्र /मैत्रीण जोडून त्यांनी च एकमेकांचा परिचय करुन देण्याची अनोखी संकल्पना राबविली. उपस्थित वक्त्यांकडून आठवणीतील चांगलं भाषण या विषयावर अर्धा मिनिट वक्तृत्व संधी देण्यात आली. यात अनेकांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रम स्थळी दुपारी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!