
आज १४ एप्रिल.. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बाबासाहेब डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची १३४ वी जयंती. त्यांचे असंख्य अनुयायी असून दरवर्षी भारत देशच नव्हे तर जगभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. यानिमित्ताने हा लेखन प्रपंच…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नावापुढे महामानव, विश्वभूषण, भारतरत्न, बोधिसत्व, प्रज्ञावंत, प्रज्ञासूर्य अशा अनेक उपाधी लागल्या आहेत यावरुनच त्यांचे विस्तृत कार्य लक्षात येते. मानवी मूल्यांची जोपासना व मानवी मूल्यांच्या उत्थानासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्य वेचले आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, एकता, सर्वधर्म समभाव, मानवता या मानवी मूल्यांची देणगी दिली आहे. आपले संपूर्ण आयुष्य दीन, दलित, वंचित, शोषित, पिडीत, कामगार, शेतकरी, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्यांक समुदायासाठी समर्पित केल्याचे दिसते. त्यांच्या जीवनातील अनेक घटनांचा वेध घेता, मानव कल्याणासाठी प्रचंड संघर्ष केल्याचे लक्षात येते. वंचित, शोषित, दलित, मागासवर्गीय, आदिवासी, ओबीसी समाजास हक्क मिळवून दिले आहेत. मानवी मूल्यांची जोपासना ही भारतीय राज्यघटनेची देणगी आहे. याचे सारे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जाते. भारतीय राज्यघटना ही नुसते कायदे कानून असलेला दस्ताऐवज नाही तर सर्वसामान्य जनतेचा श्वास आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वच घटकांना न्याय देण्याची भूमिका असल्याने म्हणावेसे वाटते…
मुक्या वेदनांना शब्द दिलेस तू..,
घायाळ पाखरांना पंख दिलेस तू…!
तुझ्याच चेतनेने जीवनास अर्थ आला..,
युगायुगांच्या शोषितांचा उद्धार केलास तू…!!
भारतीय राज्यघटना हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. जो सरकारच्या विधायी, कार्यकारी आणि न्यायिक अवयवांना बांधतो. हा दस्ताऐवज मूलभूत राजकीय संहिता, संरचना, कार्यपद्धती, अधिकार आणि सरकारी संस्थांची कर्तव्ये आणि मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे आणि नागरिकांची कर्तव्ये निर्धारित करणारी चौकट मांडतो. हे जगातील सर्वात मोठे लिखित राष्ट्रीय संविधान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. संविधानाने सर्व नागरिकांना मूलभूत अधिकार दिले आहेत आणि स्वतंत्र न्यायव्यवस्थेला संविधानाचे उल्लंघन करणारे कायदे किंवा सरकारी कृती अवैध ठरवण्याचा अधिकार दिला आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १२-३५ मध्ये समानतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, शोषणाविरुद्धचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, सांस्कृतिक – शैक्षणिक हक्क आणि घटनात्मक उपायांचा अधिकार असे सहा मूलभूत अधिकार दिले आहेत. संविधान भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, आणि लोकशाही प्रजासत्ताक घोषित करते, तेथील नागरिकांना न्याय, समानता आणि स्वातंत्र्य आणि बंधुत्वाला चालना देण्यासाठी प्रयत्नांची हमी देते. घटना ही संवैधानिक वर्चस्व प्रदान करते (संसदीय वर्चस्व नाही, कारण ते संसदेऐवजी संविधान सभेने तयार केले होते) आणि लोकांद्वारे त्याच्या प्रस्तावनेत घोषणेसह स्वीकारले गेले. संसद राज्यघटनेला डावलू शकत नाही. भारतीय राज्यघटनेची प्रत संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुपूर्द केली. भारताच्या संविधान सभेने स्वीकारले आणि २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले. राज्यघटनेने भारत सरकार कायदा १९३५ ची जागा देशाचा मूलभूत प्रशासकीय दस्तऐवज म्हणून घेतली आणि भारताचे अधिराज्य हे भारताचे प्रजासत्ताक बनले. संवैधानिक स्वायत्तता सुनिश्चित करण्यासाठी, त्याच्या रचनाकारांनी कलम ३९५ मध्ये ब्रिटिश संसदेचे पूर्वीचे कायदे रद्द केले. भारत २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणून आपले संविधान साजरे करतो. संविधान भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, आणि लोकशाही प्रजासत्ताक घोषित करते, तेथील नागरिकांना न्याय, समानता आणि स्वातंत्र्य आणि बंधुत्वाला चालना देण्यासाठी प्रयत्नांची हमी देते. १९५० चे मूळ संविधान हेलियमने भरलेल्या केसमध्ये नवी दिल्लीतील संसद भवनात जतन केले आहे.
डॉ. आंबेडकरांच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक क्रांतीमुळेच भारतातील कोट्यावधी लोकांना त्यांचे मूलभूत हक्क मिळाले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जात, धर्म, वर्णव्यवस्था, अस्पृश्यता आणि इतर प्रकारच्या सामाजिक भेदभावाला विरोध करत. सर्वांना समान संधी आणि हक्क मिळवून देण्याची भूमिका मांडत असत. सामाजिक स्वातंत्र्य, राजकीय स्वातंत्र्य, मानसिक स्वातंत्र्य, धर्म स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य, आचार विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य या मानवी स्वातंत्र्यांना चालना देणाऱ्या मुल्यांची मांडणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. सर्वांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शिक्षण आणि रोजगारावर लक्ष केंद्रित करत. लोकांना अंधश्रद्धा आणि रुढीवादी विचारांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. स्वतःच्या विचारांवर आणि बुद्धीवर विश्वास ठेवण्यास प्रोत्साहीत करत. डॉ. आंबेडकरांनी धर्माला मानवी जीवनात महत्त्वाचे स्थान दिले, पण ते धर्माला समाजातील गुलामगिरी आणि अत्याचाराचे कारण मानत नव्हते. ते असा धर्म स्विकारायला तयार होते जो स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता शिकवतो. डॉ. आंबेडकरांनी ‘मनाचे स्वातंत्र्य’ हेच खरे स्वातंत्र्य आहे, असे म्हटले आहे. म्हणजे, माणूस जर मानसिकरित्या गुलाम असेल, तर तो खऱ्या अर्थाने स्वतंत्र नसतो. डॉ. आंबेडकरांनी मानवी हक्कांसाठी भारतीय राज्यघटनेचा मसुदा मध्ये अद्वितीय कार्य केले आहे. त्यांनी भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार केला, ज्यामध्ये प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क आणि न्याय मिळवून दिला. दलित आणि महिलांच्या हक्कांसाठी आवाज उठविला आणि त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय प्रगतीसाठी कार्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्म स्विकारून, सामाजिक न्याय आणि मानवी हक्कांसाठी एक नवीन मार्ग निवडला. शिक्षण आणि जागृतीवर भर दिला, ज्यामुळे लोकांना अन्याय आणि अत्याचारांविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळाली. त्यांचे संपूर्ण आयुष्य जात – वर्णभेद आणि अस्पृश्यता यांच्याविरुद्ध उभ्या केलेल्या विद्रोहाचे एक प्रतीक होते. या व्यवस्थेने समाजातील मागास जातीच्या लोकांना आणि विशेषत: अस्पृश्य ठरवल्या गेलेल्या लोकांना अन्यायाने दडपून टाकून, त्यांचे शोषण करुन, पदोपदी त्यांचा अपमान करुन आणि त्यांना विविध प्रकारे असहाय्य आणि निराश्रीत करुन उद्ध्वस्त केले होते. डॉ. आंबेडकरांच्या मताप्रमाणे त्यांनी या जनतेला वेगवेगळ्या जातींच्या पारंपरिक आणि अभेद्य साच्यांमध्ये इतके घट्ट बंद करून टाकले होते की, अनेक शतके या देशाची अस्मिता आणि सामर्थ्य यांच्यापुढे मोठेच आव्हान उभे राहिले होते. शिवाय या जातिपद्धतीमुळे लोकांच्या निष्ठा त्यांच्या त्यांच्या जातींच्या समजुतीत गुरफटून गेल्या आणि नैतिकतेचे निकषही जाती-जातींनुसार ठरवले गेले. त्यामुळे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय या मूलभूत मानवी मूल्यांचा विध्वंस तर झालाच, त्याचबरोबर वरिष्ठ जातींनी सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा, मालमत्ता या सर्व गोष्टी हस्तगत करून घेऊन इतर वंचितांना आपले गुलाम बनवले. स्वत: डॉ. आंबेडकरांना अस्पृश्यता ही जुन्या रोममधील गुलामगिरीपेक्षाही भयंकर वाटत होती. डॉ. बाबासाहेब यांनी मानवी स्वातंत्र्याच्या दृष्टीने महान कार्य करून प्रत्येक माणसाला संविधानिक हक्क देण्याचे महान कार्य केले. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय या मूलभूत मानवी मूल्यांचे प्रखरपणे समर्थन आणि मांडणी करण्याचे काम केले. त्यांचे विचार आणि कार्य यामुळे अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. मानवी मुल्य जतन करण्यासाठी भारतीय संविधानाचे संरक्षण करणे हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी आदरांजली ठरेल..!
दिव्यचक्र परिवारातर्फे विनम्र अभिवादन..!
